Tuesday 17 October 2017

💐वाघ बारस💐

                      *वाघबारस*
               💐💐💐💐💐💐

          आदिवासींच्या जीवनातील पावन  दिवस म्हणजे वाघबारस . हा दिवस आश्विन महिन्यात काळोख पाखात बारशिंच्या दिवशी येतो . हा दिवस पावन  असण्याचं कारण म्हणजे याच दिवशी आदिवासींचे दैवत वघोबाचे पूजन केले जाते.  रवाल या आदिवासी शाळेचे  समापन याच दिवशी असते. याच दिवशी चार महिन्यानंतर गावठी औषध्या भगत परिपूर्ण तयार होतो. म्हणूनच आदिवासींच्या जीवनात वाघबारस या दिवसाचे विशेष महत्व आहे.

*वाघबारस आणि वाघोबा* 🌿

          *आदिवासी देवता मुख्यतः प्राणी,  वनस्पती व निसर्गातल्या घटकांवर आधारित आहेत*. त्यापैकी एक  दैवत म्हणजे वाघोबा= वाघया = वाघ्या.  आश्विन महिन्यात काळोखाच्या बारशीना वाघोबाचे जागरण  केले जाते,  म्हणूनच या बारशीना वाघबारस म्हणून ओळखले जाते.

           वाघोबा हा जंगलातील वाघांचा राजा मानला जातो. वाघोबा हा जंगलातील वाघांवर व जंगली प्राण्यांवर नियंत्रण ठेवतो असा समज आहे . वाघोबाची स्थापना पाड्याच्या शीवेवर केली जाते म्हणून काही भागात वाघोबाला गावशीवाऱ्या या नावानेही ओळखले जाते. शक्यतो वाघोबाची स्थापना वडाच्या मोठ्या झाडाखाली लाकडावर वाघाच्या चित्राचे कोरीव काम करून केली जाते. त्यावर शेंदूर लावला जातो.

           वाघबारशिंच्या दिवशी आदिवासी वाघोबा बसवलेल्या ठिकाणी जाऊन त्याच्या समोर  कोड्या लावतात. नारळ फोडून व टोलवा वाहून पूजन करतात. आणि देवाच्या पाया पडून आराधना केली जाते - 'आमचे, गव्हाऱ्यांचे,  गोजरा - ढोरानचे खाडया, जनावरांनपासून  रक्षण कर, आम्हाला चांगले पीक दे , आजारांना दूर ठेव' असा सुकदेव (सूकेसर) केला जातो.

*वाघबारस आणि रवाल* 🌿

           रवाल म्हणजे आदिवासींमध्ये पूर्वीपासून सुरु असलेले सात दिवसांचे प्रशिक्षण केंद्र होय. या ट्रेनिंग सेंटर मध्ये डोंगराच्या औषधांची ओळख व भगत खंड यांचे प्रशिक्षण दिले जाते. रवाल हि दसऱ्या पासून सुरू होते,  तर  वाघबारस या  दिवशी रवाल थापली (समापन) जाते.

           दसऱ्याच्या दिवशी आपल्या पाड्यापासून दूर डोंगरीला ओहळ किवा पानवठ्याची जागा निवडून पडाल = पलाड तयार करून रात्रीच्या वेळी झुन भगत साधारण सोळा रात्री प्रशिक्षण आपल्या चेल्यांना देतो. वाघबारशीच्या अगोदरच्या रात्री व वाघबारशीच्या दिवशी विशेष रीत केली जाते.

           काही नवीन भगत प्रशिक्षण पावसाळा सुरु झाल्यापासून सुरू होते. त्यांचा वाघबारशीपर्यंतचा प्रशिक्षण कालावधी साधारण चार महिन्यांचा असतो. *या प्रशिक्षणामध्ये आदिवासी संस्कार व आदिवासी तत्वज्ञान असलेले पुढील खंड शिकविले जातात*.

1. *महादेव खंड* : मनुष्य निर्मितीची कहाणी

2. *पालीचा खंड* : शारीरिक दुखापती बद्दल .

3. *बायांचा खंड* : महिलांसाठी कथा .

4. *मुठिचा खंड* : शरीरावरील आघातासारख्या आजार संदर्भात.

5. *कनसरी खंड* : धान्य देवतेची संस्कार कहाणी व महत्व .

          याशिवाय दोन पुढचे खंड आहेत जे प्रशिक्षणसाठी अनिवार्य नाहीत.

6. *दिस खंड*  :  दिवसकार्य संदर्भात कहाणी व रीत .

7. *जात खंड*  : पाप निवारण संदर्भात रीत व तत्व .

           या खंडाचा शब्द न शब्द लक्षात ठेवावयाचा असतो. त्यामुळे ज्याची स्मरणशक्ती चांगली तोच भगत बनू शकतो. हि शाळा पूर्णपणे तोंडी अभ्यासावर अवलंबून असते. येथे स्मरणशक्तीचा पूर्ण विकास केला जातो.

           वाघबारशीच्या अगोदरच्या रात्री व वाघबारशीच्या दिवशी तारपकरी देवांचे  चाले लावतो आणि  भगत लोक वेगवेगळ्या देवांचे वारे घेतात. घोर काठीच्या आवाजाने अधिक उत्साह निर्माण केला जातो. या वेळी *मखोलीची*  ( झेंडु ) फुले देवांना वाहिली जातात. त्यानंतरच म्हणजेच  वाघबारशीपासून  आदिवासी महिला हि फुले आपल्या केसात लावायला सुरुवात करतात. खरंतर योग्य वेळेच्या अगोदर कोवळी, अपरिपक्व फुले तोडू नये म्हणून वाघबारशीनंतर हि पक्व फुले तोडावीत हा मिळालेला आदिवासी संस्कार खुपच निसर्गप्रेमी आहे.

           रवालीत शेवटी - शेवटी तारप्यावर देव नाचतात आणि मग  आदिवासींच्या जीवनात तारप्याचा ठेका सुरु होतो. काहीजण वालूक, चवली, चिबुड, पावसाळ्यात होणाऱ्या भाज्या यांची *पाल = पालनुक* करतात. त्यांची हि पाल दिवाळीला संपते.

*वाघबारस आणि देवता पूजन* 🌿

           रवालीमध्ये सर्व देव व भूतांचा बंदोबस्त केला जातो असे मानले जाते. वाघबारशीनंतर घरचादेव - कुलदेव धुवणे  , गावदेव (देवाचा लगीन),  सात, नवीन देव बांधणी , खल्यात खलमेढ (खेडमेढ) गाड़ने, तोरनी चेडा, खाड़ीचा देव असे  देवपूजन पुढच्या काळात केले जाते. या पैकी काही रीती केल्या नंतरच लग्नाचा  नवीन लहान बोल खायला आदिवासींच्या गावात सुरुवात होते.

*काही आदिवासी दैवतांची नावे* 🌿

वाघोबा,  हिरवा=हिरवक=हिरोबा,  हिमाय=हुमाय, गिरजाय,  म्हसोबा, नारनदेव,  चेडोबा = चेढा , घोडी चेढा , तोरनी चेढा=मखरी चेढा=मकरित , गवली चेढा , वावटिचा चेढा, जगली चेढा ,  धरतरी , कनसरी, गावतरी, अस्तरी , कालीजग , सवरी=सनवरी=सोरे ,  खाडीचा देव, भरान देव , चांद , सूर्या , सुकेसर , ढगेसर , वीजेसर=विजापत , थापेसर , लीपेसर , खाचेसर , खापेसर , खांबेसर , मांडेसर , गानेसर , ऊबडेसर , गानेसर , गाजेसर , तापेसर , भोगेसर ,  सती माता , जाम्मू , चिता , चिंबाय=चीम्भी  , हलदाय , कानुदेव , टिकमदेव , परवत देव , दगडीदेव , दयीचादेव , धरना कोरी , नीरवल देव , उगवता बैगा , वंगलवा देव= वंगनाचा देव , वीर देव , वयोबादेव , झोटिंग , निमा देव , गयलायदेवी , कोतायरानी=कोतारानी , कारवसी देवी=कारवी देवी , सोनी जल , रूपा जल , पावश्या देव , वावडी वीरा , किरन मोकला , कुरती देव , गुरजा देवी , बाया , गीऱ्हा , शेंदराय , कुकवाय ,  वजराय , एकशिऱ्या .

*वाघबारस आणि आदिवासी दिवाली*

          आदिवासींच्या दिवाळी सण हा वाघबारस वरून ठरत असतो . वाघबारशिं नंतर तवरस , चवरस , आणि पुनींव असे दिवस येतात . या दिवसांत घरातील मोठी माणसे वरगना देव = कुल देव काढून दुधाने अथवा तांदुळाच्या पाण्याने धुतले जातात . तसेच देवांची टोपली शेनाने सारवली  जाते . हिरवा , हिमाय , नारन , बरान या देवांना शेंदूर लावला जातो.

           कापणीच्या मध्ये येणारा हा सण तयार पिके घेऊन येतो म्हणून आदिवासींचा हा सण  सुखाचा सण आहे .

          आदिवासींची दिवाळी तीन दिवस असते . आदिवासी दिवालीचा पहिला दिवस *चवरस* या दिवसापासून सुरु होतो , पण काही भागात आता तारखा बदलेल्या दिसतात .

*पहिला दिवस*

:-  या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळी करतात . त्यानंतर आपल्या ढोरांच्या शींगांना लाल गेरू लावला जातो . काही गावांत ढोरांची दिवाळी उडविली जाते . गोठ्यात ,  शेनकईत व खल्यात औषधी *कडू चीराड* ठेवली जातात व  चीराडाची कोड्या लावली जातात .

           या दिवशी *गोडाची भाकर* परिवारा  सोबत खाल्ली जाते . जी भाकर पीठ, वालुक = गावठी ककड़ी , चवली , साखर यापासून बनवतात . याशिवाय *चवली व करांदे*  हे  सोबत खाण्याचा कार्यक्रम असतो.

*दुसरा व तिसरा दिवस*

: -आदिवासी तरुण व तरूणी रंगबिरंगी कपडे घालून एकत्र जमून तारपकऱ्याच्या *चाल्यावर* तारपा नाचायला आपल्या पाड्यात  निघतात . आणि दोन दिवस आपल्या परिसरात *डुहूरली* करून  बेधुंद नाचतात .
           तारपकरी आपल्या तारप्यावर  वेगवेगळे चाले वाजवून घोरकाठीच्या तालावर फार मजा आणतो . प्रत्येक चाल्याचा नाच वेगवेगळा असतो .

           हे चाले वेगवेगळा नावाने परिचित आहेत. -- बायांचा चाला , देवांचा चाला ,रानोडी चाला , टाल्यांचा चाला , चवलेचा चाला , जोड्यांचा चाला , नवऱ्यांचा चाला , मोराचा = मुऱ्हा चाला , ऊसल्या चाला , सलातेचा चाला , बदक्या चाला , लावरी चाला .

🌿🌿 🐯🐯🐯🐯🐯 🌿🌿

No comments:

Post a Comment